वर्धा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वर्ध्यात शहर आणि सावंगी हद्दीतील गेल्या काही दिवसात चार घरफोडी घटना समोर आल्या होत्या. तपासादरम्यान प्रशांत काशीनाथ करोशी याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. देशभरातल्या विविध राज्यात त्याने आत्तापर्यंत 62 घरफोडी केल्याचं पुढे आले आहे. आरोपीवर चोरी, फसवणूक, घरफोडीचा प्रयत्न आदी 93 गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत. आरोपीकडून 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल वर्धा पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी प्रशांत काशीनाथ करोशी याने देशातल्या बेंगलोर,कर्नाटका,चैन्नई, तामिळनाडु, हैदराबाद, तेलगंणा व इतर राज्यात घरफोड्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपीने या प्रकरणात प्रेमिकेची हौस पूर्ण करण्याकरिता घरफोडी करायचो असा दावा पोलिसांसमोर केला आहे. प्रेमिकेची हौस पूर्ण व्हावी यासाठी त्याने घरफोडी करण्यास सुरुवात केली. 62 घरफोड्या करून येणाऱ्या पैशातून गोवा तसेच इतर पिकनिक पॉईन्टला जावून मौजमस्ती केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.
वर्ध्यात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने घरफोडी करण्याचे प्रशिक्षण युट्युबवरच्या माध्यमातून घेतले असून त्याचे पुढचे टार्गेट बँकेचे लॉकर असल्याचे तपासात पुढे आले आहे. हैद्राबाद येथे जावून चोरीचा त्याचा प्लॅन होता. मात्र वर्धा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला ज्या शहरात घरफोडी करायची आहे. त्या शहरात जाऊन सर्वात आधी मोटर सायकल चोरी करून शहरात रात्रीच्या दरम्यान रेकी करायचा. आरोपीने वेगवेगळ्या शहरातून एकुण 13 मोटर सायकल चोरी केल्याचे उघड झाले आहे. 62 घरफोडी, 15 चोरी करण्याचा प्रयत्न, 13 मोटर सायकल चोरी, 1 जबरी चोरी, 2 फसवणूकीचा प्रयत्न असे एकूण तब्बल आतापर्यंत 93 गुन्हे दाखल झाले असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास करणाऱ्या पथकाला 10 हजार रुपयांचा रिवार्ड पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जाहीर केला आहे.