पाझर तलावातील बेकायदेशीर उत्खननाकडे जिल्ह्यासह तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिशकालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजने कामे नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस २४ तास गौण खनिज उत्खनन सुरू असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे सर्रास उल्लंघन परवानाधारकांकडुन होत असल्याच्या निषेधार्थ तलाव क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल बोदडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे. तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजने कामे गौण खनिज उत्खनन हे फक्त धरणांच्या कामासाठी देण्यात आलेले असून सदर वाहनधारकांकडून इतरत्र गौण खनिज विक्री होत आहे.

खानकाम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करण्याचे आदेश असून सुद्धा गौण खनिज उत्खनन रात्रभर सुरूच आहे. गौण खनिज महा खनिज प्रणाली द्वारे निर्गमित केलेल्या वाहतूक पास व ईटीपी शिवाय इतरही विनापरवाना वाहनांद्वारे गौण खनिज वाहतूक केली जात आहे.परवाना आदेशानुसार गौण खनिज सांडू नये किंवा उडू नये यासाठी वाहनांवर ताडपत्रीने किंवा योग्य अशा इतर साधनाने झाकून गौण खनिजाची वाहतूक करण्याचे आदेश असून सुद्धा परवानाधारकांकडून आदेशानुसार गौण खनिज न झाकल्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांना या खनिजामुळे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार परवानाधारकाने प्रत्येक आठवड्यास दर सोमवारी खनिज वाहतुकीचा अहवाल तहसील कार्यालयात बिनचूक पाठवणे क्रमप्राप्त असताना सदर परवानाधारकांकडून कोणताही अहवाल आजतागायत तालुका प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचे तालुका प्रशासनाने तोंडी स्वरूपात सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे उल्लंघन करून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या ठेकेदारावर तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तलाव क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

Protected Content