गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गोंदिया जिल्हयात एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने कपडे धुवत असलेल्या महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुली बचावल्या आहे. ही घटना जिल्हयातील आमगावातील किंडागीपार येथे घडली आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संदीप कोरे असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, किसनाबाई चोरवाई ही महिला रस्त्याच्या कडेला आपल्या घरासमोर कपडे धुत होती. संदीप कोरे हा आपल्या शेतातून धान घेऊन ट्रॅक्टर (एमएच ३५ जी १६३७) चालवत तेथे अचानक समोरून आला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे ट्रॅक्टरवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर अचानक महिलेच्या घरात शिरला. त्यामुळे ट्रक्टरच्या चाकाखाली आल्याने किसनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नाती जवळच होत्या, या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या. याबाबत आता आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.