सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिनावल येथील संचारबंदी सोमवारी मध्यरात्रीपासून उठविण्यात आली असली तरी सायंकाळी सात वाजेनंतर बाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासोबत, ग्रामस्थांनी एकोप्याने अंतर्गत वाद मिटवावेत, अन्यथा अजून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
दोन समुदायातील दोन जणांमधील किरकोळ वादानंतर चिनावल गावात तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे येथे तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोमवारी संचारबंदीचा तिसरा दिवस होता. या अनुषंगाने संचारबंदी उठण्याच्या आधी प्रशासनाने ग्रामस्थांची बैठक घेतली.
याप्रसंगी, या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, रावेर तहसीलदार बंडू कापसे , मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे, सावदा पो स्टे चे सपोनी जालिंदर पळे यांचे सह गावातील प्रमुख पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या वेळी गावात शांतता राखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयी चर्चा झाली. चिनावलकरांनी आपल्या भावना मांडल्या असता, नखाते यांनी सदर घटनेतील आरोपी शोधून कायदेशीर कारवाई तर करणारच आहे मात्र या पुढे असे घडता कामा नये कोणी जर आपल्याला भडकवत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका अंशी तंबी दिली.
दरम्यान, चिनावल गावात जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पो स्टेशन चे सपोनी जालिंदर पळे,पो उप निरीक्षक खांडबहाले, गर्जे, यांनी सोमवारी देखील तळ ठोकला होता. तर पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने संपूर्ण चिनावल गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आले आहे. सोबतीला महसूल विभागिचे तहसीलदार बंडू कापसे,अप्पर तहसीलदार मयूर कळसे,नायब तहसीलदार संजय तायडे मडळाधिकारी अनंत खवले, तलाठी लिना राणे यांनी देखील पोलीस प्रशासनाच्या मदतीने चिनावल गावावर लक्ष ठेवण्याचे काम केले.
सोमवारी मध्यरात्रीपासून चिनावलमधील संचारबंदी उठविण्यात आली असून आज सकाळपासून दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. तर, कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त कायम राखण्यात आलेला आहे.