


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | घाटकोपर येथील अवैध होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या १४ वर गेली असून या फलकाचा मालक भावेश भिडे हा आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे. तर आता भिडेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, मुंबईत काल घाटकोपर येथे मोठे जाहिरात फलक कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. पावसामुळे सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ही दुर्घटना घडली. या फलकासाठी रेल्वेने परवानगी दिली असली तरी महापालिकेची याला परवानगी नव्हती अशी माहिती मुंबई कार्पोरेशनच्या वतीने देण्यात आली आहे. अर्थात, हा फलक अवैध असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले असून यामुळे मोठी खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत.
दरम्यान, या फलकाची मालकी असणार्या कंपनीचा संचालक भावेश भिडे हा दुर्घटना झाल्यापासूनच आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे. त्याचा फोन स्वीच ऑफ येत असल्याचे आढळून आले आहे. तर भावेश हा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करत महायुतीने या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.



