परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परभणी जिल्हयात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हयात पालम तालुक्यातील नाव्हा येथे १९ वर्षीय युवतीने आंतरजातीय विवाह केला होता. याला आईवडिलांचा विरोध होता. या कारणावरून आईवडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केली आहे. या युवतीचे दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेमसंबंध होते. आईवडिलांनी लग्नाला नकार दिल्यामुळेही तरी देखील युवतीने लग्न केले.
त्यानंतर तिला 21 एप्रिल रोजी रात्री 10 ते 22 एप्रिलच्या पहाटे दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई-वडीलांनी जीवे मारले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण आठ जणांवर हत्या, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईवडिलांनी त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेतलं. भावकीतील व्यक्तींना सोबत घेऊन संगनमत करत हत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पालम पोलिसांत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील हे करत आहेत.