जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद जवळ उड्डाणपूलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण कामगार ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. मडीया उर्फ मन्साराम भावसिंग बारेला (वय २४, रा. मलगाव जि. खरगोन, मध्यप्रदेश, हमु भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मडीया उर्फ मन्साराम बारेला हा तरूण भुसावळ येथे आई, वडील, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. बांधकामांवर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी १३ एप्रिल रोजी मडीया हा दुचाकीने एकटाच भुसावळ येथून जळगाव येथे काही कामानिमित्त निघाला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद उड्डाणपुलाजवळ त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.