जळगाव प्रतिनिधी । खेडी रोडवर झालेल्या ट्रक नाल्याजवळ कलंडल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला होता. यात दोघेजण जखमी झाले होते. प्रत्यक्षात मात्र या ट्रकला मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी रोडवर दुचाकी आडवी लावून ट्रकचालकासह क्लिनरला हल्ला चढवत मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांपासून सुटका व्हावी म्हणून चालकाने ट्रक पळवित असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्यात पडल्यान हा अपघात झाला असे जखमी ट्रकचालकाने सांगितले.
ट्रकचालकरामरतन सुरेश शिरसाठ (वय ३०) व क्लिनर रामदास ओंकार भील (वय ४१, दोघे रा.हातेड, ता.चोपडा) हे मंगळवारी पहाटे दोघे जण रिकामा ट्रक (एमएच १८ एए ९६३४) घेऊन खामगाव येथुन जळगावात येत होते. खेडी पेट्रोलपंपापासून काही अंतर पुढे आल्यानंतर पाच-सहा चोरट्यांनी पहाटे 2 वाजता ट्रकसमोर दुचाकी उभी करुन त्यांना थांबवले. रस्त्यावर उभ्या असलेल्या चोरट्यांनी ट्रकवर दगडफेक देखील सुरू केली. ट्रक थांबताच या चोरट्यांनी शिरसाठ व भील यांच्यावर हल्ला चढवला. दोन चोरटे थेट ट्रकमध्ये चढून दोघांना मारहाण करीत होते. दरम्यान, चोरट्यांनी ट्रकवर हल्ला चढवत ट्रकचालक सुरेश शिरसाठ यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी शिरसाठ व भील यांचे खिसे तपासून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चोरट्यांना विरोध करीत पुन्हा ट्रक सुरू करुन पळुन जाण्याची तयारी केली. चालक शिरसाठ याने जोराने अॅक्सीलेटर दाबून आवाज काढल्यामुळे चोरटे दचकले. यानंतर त्याने थेट ट्रक पुढे घेण्यास सुरूवात केली. यामुळे रस्त्यावरील चोरटे बाजुला झाले. तर ट्रकमध्ये चढलेल्या दोन्ही चोरट्यांनी धावत्या ट्रकमधुन खाली उड्या घेतल्या. या ते दोघे चोरटे देखील जखमी झाले. दरम्यान, या चोरट्यांनी पुन्हा दुचाकीने पाठलाग सुरू केल्यानंतर चालक शिरसाठ यांचा ताबा सुटल्यामुळे जळगाव-भुसावळ महामर्गावरील खेडी गावाजवळ ट्रक थेट ३० फुट खोल नाल्यात कलंडला. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.