चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून सोबत राहण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून गंभीर दुखापत केल्याची खळबळजनक घटना शनिवारी ३० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात सायंकाळी ६.३० वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथील माहेर असलेल्या अर्चना भगवान पाटील यांचा विवाह यावल तालुक्यातील दहीगाव येथील भगवान राजेंद्र पाटील यांच्याशी झालेला आहे. अर्चना पाटील या विवाहिता पतीसोबत काही दिवसांपासून माहेरी आईच्या घराजवळ वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होता. त्यामुळे अर्चना पाटील या विवाहिता आपल्या मुलीसोबत आईच्या घरी राहत आहेत. दरम्यान शनिवार ३० मार्च रोजी भगवान राजेंद्र पाटील आणि त्याचा मित्र आकाश नामदेव पाटील हे विवाहितेच्या आईच्या घरी आले. त्यावेळी भगवान याने पत्नी अर्चना हिला तुझ्या साड्या आणि भांडे घेवून जा मला घराला कुलूप लावायचे आहे असे सांगून विवाहितेला घरी बोलावून घेतले. त्यानंतर पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. या रागाच्या भरात भगवान पाटील याने लोखंडी कोयता हातात घेवून विवाहितेच्या डोक्यावर वार करून जखमी केले. त्यावेळी अर्चनाची आई सुरेखा देविदास महाले यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावर देखील कोयत्याने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी अखेर अर्चनाची आई सुरेखा महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई भगवान राजेंद्र पाटील आणि त्याचा मित्र आकाश नामदेव पाटील याच्याविरोधात मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शेरोळे हे करीत आहे.