धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी शिवारातील शेतातील एअरटेल कंपनीच्या टॉवरचे १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी शुक्रवारी २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी शिवारातील शेत गट क्रमांक १०५ मधील शेतात एअरटेल कंपनीचे मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहे. दरम्यान, १४ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरसाठी लागणारे १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एअरटेल कंपनीचे कर्मचारी गोकुळ पांडूरंग कोळी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.