नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मागील काही वर्षांत देशभरात राजकीय पक्षांची संख्या वेगाने वाढली असून, हा आकडा तीन हजारांच्या जवळपास पोहचला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत किती पक्ष प्रत्यक्षात निवडणूक लढणार याकडे आयोगाचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 2 हजार 800 नोंदणीकृत पक्षांपैकी केवळ 623 पक्षांचे उमेदवार मैदानात होते. 2019 नंतर तब्बल 740 पक्षांची नोंदणी झाली आहे. राजकीय पक्षांची नोंदणी सहजसोपी असल्याने हा आकडा वाढत आहे.
एखाद्या निवडणुकीआधी पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण नोंद झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात अनेक पक्ष दिसतही नाही किंवा अनेक पक्ष निवडणुकीमध्ये उमेदवार देत नाही. देशभरात अशा पक्षांची संख्या वाढत असल्याने आयोगाची चिंताही वाढली आहे. प्रत्येक निवडणुकीत आयोगाला इतर मोठ्या पक्षांप्रमाणेच या छोट्या पक्षांचाही तितक्याच गंभीरपणे विचार करावा लागतो. अशा पक्षांची संख्या थोडी थोडकी नसून तब्बल दोन हजारांहून अधिक आहे. त्यातील अनेक पक्षांनी तर एकदाही निवडणूक लढवलेली नाही.
मागील काही दिवसांत निवडणूक आयोगाने निवडणुकीत निष्क्रीय आणि वार्षिक अहवाल सादर न करणाऱ्या नोंदणीकृत 400 हून अधिक पक्षांवर कारवाई केली आहे. निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न दिलेल्या पक्षांना प्राप्तीकरातून सुट मिळू नये, अशी शिफारसही संबंधित विभागाकडे केली आहे. अशा पक्षांची संख्या अडीचशेहून अधिक आहे. त्यातही गंभीरपणे निवडणुकीला सामोरे जाणारे पक्ष केवळ 60 च्या जवळपास होते. असे असले तरी आयोगाला सर्वच पक्षांची उठाठेव करावी लागते. त्यामुळे व्यवस्थापनावरही भार पडतो.