धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी व शुक्रवारी धाराशिव मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. औसा येथे गुरुवारी दुपारी उद्धव ठाकरे यांची घणाघाती सभा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी ओळखत नव्हते, त्यावेळेसपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेना जिंकत आहे. त्यामुळे भाजपकडून केवळ आरोप केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह दोघेही नेहमीच महाराष्ट्रात येत आहेत. दुसरीकडे मणिपूरला का जात नाहीत? असा सवाल विचारत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते. राज्यातील जनता सध्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे राज्यातील जनता चवताळली आहे, निवडणूक कधी होणार याची वाट पाहत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना धाराशिवचा गड पुन्हा राखणार असल्याचे सांगत जनता आमच्या बाजूनेच उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी धाराशिव मुक्कामी असणार आहेत. तत्पूर्वी धाराशिव लोकसभेतील पाच मतदारसंघांत त्यांच्या सभा होणार आहेत. त्यांची गुरुवारी उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार वाजता सभा होणार आहे. सायंकाळी सात वाजता तुळजापूर येथील आंबेडकर चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे. धाराशिव शहरात मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कळंबच्या मार्केट यार्ड मैदानावर सभा होईल. त्यानंतर परंडा येथे दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.