चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | दारू ही आयुष्य उध्वस्त करणारे पेय आहे. अनेक परिवाराचा नाश यामुळे झाला आहे. याच दारूच्या बळी ठरलेल्या चंद्रपूर येथील मौशी गावाचे दोन मुली व त्यांची आई. त्यांच्या दारूडया बापाने कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी ३ मार्च रोजी पहाटे नागभीड तालुक्यातील मौशी येथे घडली. पोलिसांनी दारूडया आरोपी अंबादास तलमले याला अटक केली आहे. त्यांने पत्नी अलका (वय ४०), मुली प्रणाली (वय १९) आणि तेजस्विनी (वय १०) यांची हत्या केली. त्यामुळे जिल्हा हादरला आहे.
आरोपी अंबादास तलमले हा चंद्रपूर जिल्हयातील मौशी गावाचा रहिवासी आहे. पत्नी अलका, तीन मुली व मुलगा अनिकेत असे त्याचे कुटुंब होते. मोठया मुलीचे लग्न झाले होते. त्याला गेल्या काही वर्षापासून दारूचे व्यसन लागले होते. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. तो काम करत नव्हता. त्यामुळे घर चालवण्यासाठी पत्नी अलका व दोन मुली शेतीकाम करायच्या, तर मुलगा अनिकेत पानटपरी चालवायचा. तो नेहमी पत्नीकडे दारूसाठी पैसे मागायचा. नाही दिले तर पत्नीला मारहाण करायचा. शनिवारी पत्नी अलकाकडे काही पैसे होते. त्यामुळे आरोपी अंबादासने पैशाची मागणी केली मात्र पत्नी अलका हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अंबादास याने वाद घातला.
रविवारी पहाटे मुलगा अनिकेत पानटपरीवर निघून गेला. यादरम्यान अंबादास यांने गाढ झोपेत असताना पत्नी अलका, मुली प्रणाली आणि तेजस्विनी यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तिन्ही जणांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून कुऱ्हाड घेऊनच तो झोपायचा. त्याच कुऱ्हाडीने अंबादासने पत्नी, दोन्ही मुलींना ठार केले. हत्या केल्यानंतर आरोपी अंबादास घरीच बसून होता. दारूच्या व्यसनाने अंबादासचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो गावात अनेकांशी वाद घालयचा. पंधरा दिवसांपूर्वी त्याने गावातील एकाच्या घरात शिरून टीव्ही फोडली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय राठोड यांच्यासह पोलिस गावात पोहचले. त्यांनी अंबादासला अटक केली. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांची उपस्थिती होती. या घटनेचा तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.