Home क्राईम ब्रेकींग न्यूज : गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

ब्रेकींग न्यूज : गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; एमआयडीसी पोलीसांची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरात जुन्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलीसांनी शनीवारी अटक केली आहे. दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोहम गोपाल ठाकरे वय १८ रा. मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर देखील दिक्षांत हा सोहमला नेहमी खून्नस देवून पाहत होता. शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सोहम हा त्याचे मित्रांसोबत मेहरूण येथील श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका दुचाकीवर दिक्षांत सपकाळे, गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते. चौघांनी सोहमला शिवीगाळ केली. याचा जाब विचारताच दिक्षांतने सोहमवर गोळीबार केला आणि चौघे दुचाकीवरून पसार झाले. या गोळीबारमध्ये कुणाला काहीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हल्लखोर पसार झाल्याने दोन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केले होते. दरम्यान गोपनीय माहितीनुसार हल्लेखार संशयित दिक्षांत उर्फ दादू सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपुर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता संशयित दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) या दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound