जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा 28 व 29 फेब्रुवारी 2024 रोजी अहमदनगर येथे होणार आहे. नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अहमदनगर शहरातील भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्यात 200 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होत असुन उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.
दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्यात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. नामांकित उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीची संधी कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी, स्टार्टअप व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन ॲप्रेंटिसशिप यासह स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.
सकाळी 10 ते 11 या वेळेत अनिल पवार, एनरिच कन्सलटंसी, छत्रपती संभाजीनगर हे भविष्यातील नवतंत्रज्ञान व रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11-00 ते 12-00 या वेळेत शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर येथील प्राचार्य डॉ. दादासाहेब करंजूले हे मुलाखतीचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12-00 ते 1-00 या वेळेत सिम्युसॉप-ट टेक्नॉलॉजी, पुणे येथील कार्यकारी संचालक सुनिल चौरे हे इंडस्ट्री 4.0 व इनोव्हेशन, स्टार्टअप या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी 2-00 ते 3-00 या वेळेत अमित मखरे रोजगार निर्मिती संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी 10-00 ते 11-00 या वेळेत सी.ए.इन्स्टिट्युट, अहमदनगरचे चार्टर्ड अकाऊटंट राजेंद्र काळे हे शासकीय योजनांसाठी प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11-00 ते दुपारी 12-00 टेक्नोट्रॅक प्रा.लि. अहमदनगरचे संचालक सुमित सोनवणे हे निर्यात क्षेत्रातील संधी व आव्हाने या विषयावर, दुपारी 12-00 ते 1-00 या वेळेत शासकीय तंत्र निकेतन, अहमदनगरचे डॉ. एस.डी. दुबल हे परिचय पत्र तयार करणे या विषयावर तर दुपारी 2-00 ते 3-00 या वेळेत इंडो इस्त्रायल अँग्रो इंडस्ट्रीज चेंबर अँड महा. ॲग्रोवर्ल्ड फार्मर प्रोडक्टस कंपनी, मुंबईचे निर्यातक विनायकराव भुसारे हे निर्यात क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी https://nmrmahmednagar.in हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.