जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता पाझर तलाव मेहरुण गावात शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान चौकशी अंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी १५ दिवस अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता मेहरुण गाव शिवारातील पाझर तलाव येथे शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्याने जिल्हा पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन सर्व रा. जळगाव या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.