मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुती सरकारने आज मराठा समाजाला एकमताने 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, हे करत असताना आम्ही कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. त्यांचे आरक्षण अबाधित ठेवले, त्यामुळे राज्यभरात संपूर्ण मराठा व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने नांदेल, याची मला खात्री आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाचा कायदा दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर त्यांनी विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांसह अधिकारी, मागास वर्ग आयोग व सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सभागृहाने एकमताने कायदा पारित केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले होते. त्यावेळी त्यांनी काढलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी न्यायमूर्ती भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत केली गेली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागास वर्ग आयोगाला आम्ही मॅनडेट दिले होते. मागास वर्ग आयोगाने देखील जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्त घरांमध्ये जाऊन सर्व्हे केला. त्यानंतर त्यांनी अहवाल दिला. त्या अहवालावर आधारित कायदा आज पारित करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, या सर्वेक्षणासाठी साडे तीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी व विविध संस्थांनी काम केले. आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो. दुसरे म्हणजे मला विश्वास आहे एकीकडे आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजाच्या विकासासाठी आम्ही विविध काम करतोय. सारथी योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल यासह सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या विकासासाठी काम करत आहे.
दुसरी बाब म्हणजे हे सर्व करत असताना आमच्या सरकारने कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला अडचण येऊ दिली नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवले. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा व ओबीसी समाज मोठ्या गुण्यागोविंदाने राहिल. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जसे वातावरण होते, अगदी तसेच वातावरण राज्यात असेल, याचा मला विश्वास आहे. तर दोन्ही समाजाच्या विकासासाठी आम्ही कायम कटीबद्ध असणार आहोत.
सभागृहात विरोधकांना साथ दिली पण बाहेर आल्यावर नाराजी व्यक्त केली, या पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, विरोधकांचे तेच काम आहे की, पण आम्ही कायदा आणला तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी बाहेर काय म्हटले याला तसे महत्त्व नाही. निवडणूका तोंडावर आल्या म्हणून आरक्षणाचा कायदा असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, विरोधकांची भूमिका ही विरोधीच असते. पण निवडणुका असो किंवा नसो आम्ही आरक्षणासाठी गेल्या दीड वर्षांपासून यावर काम करत होतो. सातत्याने त्यासंदर्भात निर्णय देखील घेतले जात होते. सर्व बाजूंचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकणारे आरक्षण देण्यात आले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे जरी आमचा विरोध करत असले. तरी देखील त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले असेल तर त्यांचेही आम्ही स्वागतच करणार आहोत. मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले जावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, धार्मिक आधारावर कोणालाही आरक्षण देता येत नाही. हा भाजपचा अजेंडा नाही. कॉंग्रेसचा अजेंडा असेल तर तुम्ही हा प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारावा, असे म्हणत फडणवीसांनी जोरदार टोला लगावला.