नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री तथा नाशिकच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेले बबनराव घोलप यांनी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग केल्याची घोषणा केली असून यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का मानला जात आहे.
बबनराव घोलप हे शिवसेनेचे जुणे जाणते नेते असून ते तब्बल पाच वेळेस आमदार तर एकदा मंत्री राहिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र मार्ग निवडल्यावरही ते उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. या पार्श्वभूमिवर, त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
पक्षाने आजवर सांगितलेली सर्व कामे आपण चोख पार पाडली. मात्र मला शिर्डीच्या संपर्क प्रमुख पदावरून अचानक काढून अपमानीत करण्यात आले. यामुळे आता थांबावेसे वाटत असल्याने आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग केला असल्याचे घोलप यांनी सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-उबाठा पक्षातर्फे लढण्यास इच्छुक होते. तथापि, अलीकडेच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पक्षात दाखल झाल्यामुळे घोलप अस्वस्थ असल्याने याचमुळे त्यांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतल्याचे समजते. तर त्यांच्या राजीनाम्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना-उबाठा पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.