जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील एका 59 वर्षीय प्रौढाने नैराश्यातून घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दुपारी उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर चुडामण लोहार (वय-59) रा.कुसुंबा ता.जि. जळगाव हे रिक्षा गॅरेजचे मेकॅनिक आहे. त्यांचे कुसुंबा येथे गॅरेज असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यापासून नैराश्येत वावरत होते. दरम्यान त्यांना दारूचे देखील व्यसन होते. गेल्या दोन दिवसापासून त्यांचे मुलगा, पत्नी हे सुरत येथे विवाहित मुलीकडे भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे ते घरात एकटेच होते. आज सकाळी 11 वाजेपर्यंत दरवाजा बंद असल्याने शेजारी राहणार सुनिल गोराणे दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून पाहिल्याने ईश्वर लोहार यांनी दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. गळफास घेतल्याची माहिती त्यांचा पुतण्या राकेश लोहार आणि भाचा संजय लोहार यांना सांगितले. मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याबाबतचे कामकाज सुरू होते. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे.