नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेसच्या सरकारच्या कालखंडात याआधी चारा, कोळसा, 2 जी,4 जी असे अनेक घोटाळे आजवर उघडकीस आले आहेत. परंतू मोदी सरकारमध्ये चक्क ‘कंडोम’ घोटाळा उघडकीस आला आहे. आपल्या देशात कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला संगनमताने कोट्यवधींचा चुना लावलाय. धक्कादायक म्हणजे यात दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे.
2010 ते 2014 दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मोफत कंडोम वितरणासाठी मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बोली प्रक्रियेत 11 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. परंतु या कंपन्यांनी संगनमताने कंडोमचे विक्री दर वाढवून सांगितले होते. त्यामुळे त्यात कमी किंमतीची बोली लागली नाही. काही दिवसांपूर्वी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ने (सीआयआय) या संदर्भात चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार कंपन्यांनी संगनमताने जास्त दराची निविदा दिली आणि इतर कंपन्यांनी त्याला आव्हान दिले नसल्याचे समोर आले.
‘मेडिकल प्रोक्युअरमेंट एजन्सी सेंट्रल मेडिकल सर्विसेस सोसाइटी’ला आता कंडोम खरेदी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. त्यानंतर हा घोटाळा समोर आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यामध्ये कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मलिदा वाटून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.ज्या कंपन्या याप्रकरणी दोषी आढळतील, त्यांना त्यांच्या वार्षिक नफ्याच्या 3 पट किंवा सरासरी नफ्याच्या 10 टक्के यातील जी रक्कम मोठी असेल ती दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे.
या कंपन्यांचा या घोटाळ्यात समावेश
अनोंदिता हेल्थकेअर, क्यूपिड लिमिटेड, मर्केटर हेल्थकेअर लिमिटेड, कॉन्वेक्स लेटेक्स प्रायव्हेट लिमिटेड, जेके अँसेल प्रायव्हेट लिमिटेड, यूनिव्हर्सल प्रॉफिलेक्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडस मेडिकेअर लिमिटेड, एचएलएल लाईफकेअर, टीटीके प्रोटेक्टिव डिवायसेस, सुपरटेक प्रॉफिलेक्टिक्स (इंडिया) लिमिटेड आणि हेवेया फाईन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा या घोटाळ्यात समावेश आहे.