जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव गटारीचे बांधकाम रोखण्यासह प्रभाग समिती कार्यालयात येऊन भुपेंद्र प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी भाऊंच्या उद्यानानजीक असलेल्या मनपा प्रभाग समिती कार्यालयात घडला. तू माझा नोकर झाला आहे, असे म्हणत त्याने शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी भुपेंद्र कुलकर्णी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन वर्षा कॉलनी परिसरात गटारींचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी २ फेब्रुवारी रोजी दुपारी भुपेंद्र कुलकर्णी हा गेला व तेथे ठेकेदार व मिस्तरींना काम लगेच बंद करा असे सांगितले. तसेच शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या मोबाईलवर संपर्क साधत गटारीचे काम व्यवस्थित होत नसल्याने माप घेऊन काम करे असे सांगू लागला. त्यावेळी पुराणिक यांनी मी सर्वेक्षणाचे काम करत असून तुम्ही प्रभाग समिती कार्यालयात या, असे सांगितले. त्यानंतर ते कार्यालयात असताना कुलकर्णी तेथे पोहचला व शिवीगाळ करत पुराणिक कोण आहे, असे ओरडू लागला. अभियंत्यांनी त्यांची ओळख दिली व काय काम आहे, असे विचारले. त्या वेळी कुलकर्णी याने पुराणिक यांच्या थेट कानशिलात लगावली. त्यात त्यांचा चष्मा तुटला. आता तू माझा नोकर झाला आहे, ‘तू महिन्याला पगार घेतो तेवढा मी माझ्या वॉचमनला देतो, तुला कोठे तक्रार करायची आहे तू कर, मी पाहून घेईल’ अशी धमकी दिली.
या प्रकरणी पुराणिक यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भुपेंद्र कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करत आहेत.