भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी सावकारे यांनी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीतील कामकाजाबाबत झाडाझडती घेत बीडीओंची कानउघडणी केल्याची घटना येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भटकर हे तालुक्यातील सरपंचांची कामे करत नसून विविध बाबींसाठी अडवणूक करत असल्याची तक्रार सौ. पल्लवी सावकारे यांच्याकडे करण्यात आली होती. यामुळे पुण्याहून प्रवास करून भुसावळला आल्यानंतर त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठून बीडीओंना धारेवर धरले.
तालुक्यातील विविध गावांच्या सरपंचांनी पंचायत समितीत आपली कामे होत नसल्याचा पाढा वाचला. यात पैसे घेतल्याशिवाय एम.बी. नोंद न होणे, शौचालयाचे अनुदान न मिळणे, गोठा मंजूर असूनही न मिळणे आदींसह विविध कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याबाबत जि.प. सदस्या सौ. पल्लवी सावकारे यांनी बीडीओ भटकर आणि त्यांच्या सहकार्यांना धारेवर धरले. याप्रसंगी पंचायत समितीचे अनेक अधिकारी हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी याबाबत गटविकास अधिकार्यांना कारवाईचे निर्देश दिले. याप्रसंगी बीडीओंनी सर्व सरपंचांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, याप्रसंगी सौ. पल्लवी सावकारे यांचा रूद्रावतार पाहून पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी धास्तावल्याचे दिसून आले.
पहा : पल्लवी सावकारे यांनी धारण केलेल्या रूद्रावताराचा व्हिडीओ.