अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे कुपोषणग्रस्त बालके रामभरोसे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंगणवाडी सेविकांचे मागील दोन महिन्यांपासुन सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे तालूक्यातील आदिवासी पाडा वस्तीवरील राहणाऱ्या कुटुंबातील कुपोषणग्रस्त बालकांचे पोषण आहार वेळेवर न मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याची परिस्थिती धोक्यात आली आहे. याबाबत संबधित एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने या विषयाची गांर्भीयाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे विविध आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बोलले जात असून तसे न झाल्यास या बालकांच्या जीवनास धोका निर्माण होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

यावल तालूका हा अतिदुर्गम अशा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून, या सातपुडा पर्वताच्या दुर्गम क्षेत्रात आदिवासी बांधवांच्या वाडा, पाडा वस्त्या असून या ठिकाणी मोलमजुरी करून आदिवासी बांधव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान या आदिवासी क्षेत्रातील विविध पाडा वस्तीव सुमारे १०० च्यावर कुपोषणग्रस्त लहान बालक आहे. या सर्व बालकांना नियमित त्यांना शासनाच्या वतीने दिले जाणारे पोषण आहार दिले जात होते, मात्र गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून संपुर्ण राज्यात अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासाठी आपले कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात यावल तालूक्यातील सुमारे ४०० हून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

यावल तालूक्यातील आदिवासी पाडयांवरील राहणाऱ्या कुपोषणग्रस्त बालकांचे पोषण आहार व आरोग्य तपासणी अभावी त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. या पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते अशा कुपोषणग्रस्त बालकांचे जीवन वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने निर्णय घेऊन या कुपोषणग्रस्त बालकांना पोषण आहार आणी आरोग्य सेवा उपलब्ध करावी अशी मागणी आदिवासी समाजसेवी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान यावल येथील प्रभारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी याबाबत माहिती देतांना सांगीतले की यावल कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील कुपोषीत असलेल्या बालकांची काळजी घेतली जात आहे. या अंगणवाडी सेविकांच्या मागील दोन महिन्यापासुन सुरू असलेल्या आंदोलनात नवनियुक्त ३७ अंगणवाडी सेविकांचा सहभाग नसल्याने कार्यालयाच्या वतीने व गावपातळीवरील समितीच्या माध्यमातून कुपोषित बालकांची काळजी घेतली जात आहे. त्यांना अगदी वेळेवर पोषण आहार देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची माहिती प्रभारी बाल प्रकल्प विकास अधिकारी अर्चना आटोळे यांनी दिली आहे .

Protected Content