जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदायला येत नाही म्हणून पती-पत्नीत वाद होऊन पती अजित हमीद तडवी (वय-३१, रा. तांबापुरा, जळगाव ) याने पत्नी शहनाज तडवी (वय-२२, रा. तांबापुरा) यांना मारहाण करीत मानेवर विळ्याने वार केल्याची घटना शुक्रवारी हरिविठ्ठल नगरात घडली. या प्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांबापूर येथे राहणाऱ्या तडवी दाम्पत्यामध्ये वाद असल्याने पत्नी शहनाज या माहेरी हरीविठ्ठल नगरात निघून गेल्या. त्यांना घेण्यासाठी अजित तडवी हा शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हरीविठ्ठल नगर येथे गेला असता तेथे वाद झाला. त्यावेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी केले व तू माझ्यासोबत नांदायला आली नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी शहनाज तडवी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती अजित तडवी विरुद्ध सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करत आहेत.