नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘राफेल करार हा चोरीचा मामला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे,’ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर केलेल्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या अभिभाषणात राफेलचा उल्लेख केल्याबद्दल विचारण्यात आले असता राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीत चोरी झाल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीत चोरी झाल्याचा आरोपावर मी ठाम आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी नेहमीच राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने मात्र यामध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपला उत्तराधिकारी आपण नाही तर पक्ष निवडणार असल्याचे सांगितले.