शहर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील दाणा बाजारातील एसएसडी ड्रायफ्रूट दुकानासमोर चार चाकी वाहनातून लॅपटॉप चोरी केल्याची घटना शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दर्शन ईश्वर चोरडिया (वय-२४, रा. वीरदर्शन नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणाबाजार येथे एसएसडी ड्रायफ्रूट नावाचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी त्यांची चारचाकी गाडी दुकानासमोर लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या चारचाकी वाहनातील बॅगेत ठेवलेला लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दर्शन चोरडिया यांनी सर्वत्र शोध घेतला,मात्र लॅपटॉप संदर्भात काही माहिती मिळाली नाही. त्यानुसार त्यांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बशीर तडवी हे करीत आहे.



