धुळे प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
याबाबत वृत्तांत असा की, काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी शहराच्या आमदारकीचे ग्रहण सुटले, असे वक्तव्य केले. त्यावर आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांपेक्षा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी चांगले आहेत. निवडणुकीतील उमेदवारांची यादी रात्री मागितल्यानंतर आपण यादी दिली. मात्र स्थानिक नेत्यांनी दिलेली यादी दानवेंकडे असताना अजून यादी आली नाही असे त्यांनी सांगितले. तेव्हाच आपण त्यांना तीन मंत्र्यांना दुखवण्यापेक्षा माझ्या मार्गाने जाऊ द्यावे, असे म्हटले, तेव्हा त्यांनी ढोंगीपणा केला. तीन लाख मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची फसवणूक करताना प्रदेशाध्यक्षांना संकोच वाटला नाही. ते खोटे बोलतात. प्रदेशाध्यक्षांनी खोटे बोलण्यात तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मुशर्रफ यांनाही मागे टाकल्याची टीका आमदार गोटे यांनी केली. दरम्यान, आमदार गोटे यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम राखल्याचे या पत्रकार परिषदेतून दिसून आले आहे.