कराड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून फलटण, शिरवळ, लोणंदमधील तब्बल २३ गुन्हे उघड करुन, सोन्याचे ५३ तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा एकूण २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यांमधील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
दरोडा व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांना सक्त सूचना दिल्या आहेत. अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी ही मोठी कारवाई यशस्वी केली. त्यांनी सहाय्यक निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले होते.
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यांमध्ये रोहित उर्फ टक्या चिवळ्या पवार (रा. सुरवडी, ता. फलटण) याचा सहभाग असल्याचे या पथकाच्या तपासात समोर आले. त्यानुसार पोलीस फौजदार अमित पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसोबत खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण व पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसांकडून पुढील चौकशीला सुरूवात केली जात आहे.