भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांची शहराध्यक्षपदी तर प्रशांत पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. परिक्षित बर्हाटे यांच्या जागे ते शहराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक व त्यांचे निकटवर्तीय म्हणून युवराज लोणारी यांची ओळख असून आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आहे.
भुसावळ शहराच्या राजकारणाचा तीन दशकांपासून अनुभव असलेल्या श्री. लोणारी यांच्या नियुक्तीचा भाजपला संघटनात्मक वाटचालीत लाभ होईल असे मानले जात आहे. तर तालुक्याची धुरा प्रशांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून कार्यकारिणीत उर्वरित सदस्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल युवराज लोणारी यांचे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.