भुसावळ बाजारपेठ पोलीसांची धडक कारवाई
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीवरील पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलीसांना यश आले आहे. ही कारवाई शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीजवळील पाण्याच्या टाकीजवळ दोन जण अवैधरित्या गावठी बनावटीचे कट्टा आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी प्रकाश सुभाष धुंदे रा. नाडगाव ता.बोदवड याला अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस हस्तगत केले. त्याची कसून चौकशी केली असता तौसिफ असलम तडवी रा. आयान कॉलनी, खडका चौफुली भुसावळ याच्याकडून विकत घेतल्याची सांगितले.त्यानुसार पोलीसांनी त्याला देखील अटक केली. याप्रकरणी पोलीस नाईक संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी करीत आहे.