“मुख्याध्यापक पालकांच्या दारी” पी.टी.पाटीलांचा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी विद्यार्थी तसेच शाळेचे हित जोपासण्यासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविला तो म्हणजे “मुख्याध्यापकांचे पालकास पत्र”. प्रत्यक्ष स्वत: विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी जावून  पत्र वाटप करण्यात आले आणी पत्राचे महत्व पटवून सांगितले.

याबाबत मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सांगितले की, या शैक्षणिक उपक्रमातून शाळेतील विद्यार्थी हे १००% उपस्थित राहतील आणि पालक आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देतील आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल  तसेच विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होईल. हा हेतू यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर पत्राचे पालक वाचन करून मुख्याध्यापकांना धन्यवाद देत होते आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत होते. स्वखर्चाने मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी हा उपक्रम राबविला.

पत्रातील आशय पुढीलप्रमाणे :-

मुख्याध्यापकांचे पालकास पत्र….

‘समस्त पालक जनहो, सप्रेम नमस्कार!, समाजाचा एक घटक म्हणून, समाजाचे उत्तरदायित्व म्हणून, आपणाशी हितगुज करू इच्छितो. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. ही संपत्ती वाढली पाहिजे. फुलली पाहिजे. माळी ज्याप्रमाणे बागेची काळजी घेतो,  बाग फुलते, बहरते, आनंददायी पुलकित वातावरण तयार होते. मन प्रसन्न होते. तद्वतच आपली मुले आनंदी, हसरी, प्रसन्न व टवटवीत ठेवण्याची शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे.

पालक म्हणून आपला सक्रिय पाठिंबा, सहभाग असल्याशिवाय मुलांचा विकास होणार नाही. म्हणून पत्राच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आपण आपल्या पाल्यास शालेय साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणारच परंतु तो नियमित शाळेत जातो की नाही? वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होतो की नाही? हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे. सुजाण पालक म्हणून आपल्या पाल्याच्या अभ्यासात मदत करणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे हे आपले कर्तव्य आहे.

विद्यार्थी केवळ अभ्यासात हुशार असून चालत नाही, तो आज्ञाधारक, नम्र, जिज्ञासू, चिकित्सक असावा. म्हणून तसे निकोप वातावरण तयार करणे आवश्यक आहे. मी व माझे सहकारी ज्ञान यज्ञात आपल्या सोबत आहोत. साथ हवी ती आपली. सहकार्य हवे ते आपले. आपण आजपर्यंत आमच्या सोबत होताच. यापुढेही राहणार. परस्परांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा व हा ज्ञान यज्ञ अखंड तेवत राहावा हीच अपेक्षा.!

आपला नम्र—

श्री. पी. टी  पाटील

Protected Content