रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सततच्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा रावेर तालुक्याला फटका बसला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर स्वत: जिल्हाधिकारी हे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
काल सायंकाळपासून रावेर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. यात अनेक ठिकाणी मुसळधार जलधारा कोसळल्या आहेत. यामुळे तापीसह सर्व नद्या आणि नाल्यांना पूर आलेला आहे. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे ४२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, आजच्या पावसाचा रावेर तालुक्याला मोठा फटका बसला आहे.
आरावेर तालुक्यातील अनेक गावांना आज पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने आधीच येथे सतर्कतेचा इशारा दिला असल्याने संभाव्य हानी टळली. यात प्रामुख्याने तापी नदीच्या बॅक वॉटरमुळे समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये निंबोल ते ऐनपुर रस्त्यावर बॅकवॉटरचे पाणी आल्यामुळे येथून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. नेहता, उटखेडा आदी गावांमध्येही हीच समस्या निर्माण झाली आहे. खिरवड, निंबोल, ऐनपूर, निंबोल, निंभोरा सीम, धुरखेडा आदी गावांमधील काही ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर तालुक्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या पावसाचा केळी पिकाला देखील मोठा फटका पडला आहे. अतिवृष्टीमुळे केळीचे नुकसान झाले असून याची पाहणी देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.