मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचे निर्णय घेतले असतांनाच मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाबाबत उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या नवव्या दिवशी खूप घडामोडी घडल्या. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निजामकालीन कुणी नोंदी असणार्या मराठा समाजबांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळेला असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जुन्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली असून ही समिती एका महिन्याच्या आत अहवाल देणार आहे. या दोन्ही निर्णयांचे जीआर आजच जारी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याबाबत मनधरणी केली. याप्रसंगी खोतकर यांनी जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणे देखील करून दिले. यावर जरांगे यांनी आपण आपल्या सहकार्यांसह बोलून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती दिली.