बुलडाणा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथे पार पडलेल्या राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी ‘उपक्रमात महावितरणच्या डिजीटल सेवा व ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी सुमार् पाचशे लोकांनी महावितरणच्या स्टॉलला भेट देत माहिती घेतली. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच विविध योजनेची माहिती महावितरणकडून देण्यात येत आहे.

ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आणि ग्राहकांना लाभ देणाऱ्या महावितरणच्या सेवा व योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले.
बुलडाणा येथे आयोजित राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी ‘जनतेला एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ या उपक्रमात महावितरणच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये वीज जोडणीपासून वीज बिल भरण्यापर्यंत असलेल्या महावितरणच्या डिजीटल सेवा,त्या सेवांचा ग्राहकांना होणारा फायदा याची माहिती असणारे बॅनर्स व पोस्टर्स लावण्यात आले होते.तसेच शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी असणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, कृषी धोरण २०२०, रूफ टॉप सोलर योजना, कुसूम योजना इत्यादी योजनांची माहितीही फ्लेक्स व बॅनर्सच्या माध्यमातून देण्यात आली.
सोबत महावितरणच्या स्टॉलला भेटी देणाऱ्या प्रत्येक जणांना महावितरणच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देतांना त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तरही देण्यात आले. महावितरणच्या सेवा तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नसून त्या योजनेचा लाभ ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांना घरबसल्या कसे घेता येते याबाबत माहिती देण्यात आली.
महावितरणच्या स्टॉलला मेळाव्यातील सुमारे पाचशे लोकांनी भेट देत महावितरणच्या डिजीटल सेवा व योजनांची माहिती घेतली. महावितरणचे कार्यकारी अभियंता बदरीनाथ जायभाय, मंगलसिंग चव्हाण उपकार्यकारी अभियंता विनोद गुबे,उच्चस्तर लिपीक श्रीकांत चव्हाण यांच्यामार्फत प्रत्येक व्यक्तींना माहिती देण्यात आली.यावेळी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके,विभागीय कार्यकारी अभियंते विरेंद्रकुमार जसमतीया,रत्नदिप तायडे उपस्थित होते.