मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज अजित पवार आणि सहकार्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यात भुजबळ यांनी थेट विठ्ठला आम्हाला सांभाळून घ्या अशी विनवणी करून साद घातल्याचे वृत्त आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा ते पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले होते.
यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, शरद पवार साहेब हे मिटींगला येथे आले असतांना आम्ही वेळ न घेता येथे आलो. आम्ही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी त्यांनी योग्य विचार करावा अशी विनंती आम्ही केली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे पटेल म्हणाले.
यानंतर जयंत पाटील यांनी सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची माफी मागितल्याची माहिती दिली. तर याच बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पवार साहेबांच्या पाया पडून विठ्ठला आम्हाला सांभाळून घ्या अशी साद घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी याबाबत काहीही भाष्य केले नसल्याचेही समजते.