जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली होती. या अपघातात स्वप्निल सुरेश जोशी यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील देविदास कॉलनीत राहत असलेले स्वप्निल जोशी हे वास्तव्यास होते. मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हे (एमएच १९ बीएच ०४१३) क्रमांकाच्या दुचाकीने खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून घरी परतत असतांना फ्लायओव्हरवरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ बीएच ०४१३) क्रमांकाचे डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जात होता. त्याने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्निल जोशी हे दुभाजकावर आदळून त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर डंपरचालकाने डंपर थोड्या अंतरावर उभा करुन तो तेथून पळून गेला. पोलिसांनी ते डंपर ताब्यात घेतले. याप्रकरणी बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.