जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदीराजवळ चोपडा आगाराच्या बसचा अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरकडून चोपडा येथे जाणाऱ्या चोपडा आगाराची बस क्रमांक (एम.एच.२०, बी.एल.२५३८) ही बस जळगाव तालुक्यातील ममुराबाद मार्गे चोपड्याला जाण्यासाठी बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता निघाली. या बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते. त्यावेळी ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदीराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजुला गेली. मात्र, त्याठिकाणी चिखल असल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली, त्यात बस काही प्रमाणात उलटली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. बसचा दरवाजा खाली दाबल्या गेल्यामुळे बसच्या आपतकालीन दरवाजा उघडण्यात आला. त्या दरवाज्यातून ममुराबाद ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बसचे चालक के.एस.भोई व वाहक के.एम.चव्हाण यांनाही सुदैवाने कोणत्याही जखमा झाल्या नाहीत. दरम्यान, ही माहिती जळगाव आगार प्रमुखांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने आगारातील दुसरी बस प्रवाशांना घेवून जाण्यासाठी रवाना केली. त्यानंतर बसने सर्व प्रवाशांना चोपडा बसस्थानकात सोडण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.