जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगरातील ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरात एकाला थांबून मारहाण करत त्याच्या जवळील मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांपैकी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव टोल नाका परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील ख्रिश्चन स्मशानभूमी जवळ दोन जणांनी एका तरुणाचा रस्ता अडवून त्याला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल व रोकड लांबवल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव टोल नाका परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, विजय पाटील, प्रीतम कुमार पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील अशांचे पथक नेऊन त्यांना संशयित आरोपीवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी २० जून रोजी २ वाजता संशयित आरोपी युसुफ उर्फ चिल्या रा. शिवाजीनगर, जळगाव याला जळगाव टोल नाका परिसरातून अटक केली. त्याने हिसकावून नेलेला मोबाईल जप्त केला असून गुन्ह्यातील रोकड खर्च केल्याचे सांगितले. या संदर्भात पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.