चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील बोढरे गावातील दोन महिलांना आज सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन ग्रामपंचायत सदस्या अनिता चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सामाजिक कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावातून दोन महिलांचा अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार आज ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन महिलांचा सन्मान करण्यात आला. यानुसार तालुक्यातील बोढरे गावातील संगिता दिलीप जाधव व रोहिणी अनिल चव्हाण या कर्तबगार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान’ पुरस्कार सदस्या अनिताबाई प्रेमचंद चव्हाण यांच्या हस्ते देऊन आज गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ, रोख रक्कम ५०० रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी ग्रामसेवक सतीश बंडगर, सामाजिक कार्यकर्ते गुलाब राठोड, रोजगारसेवक प्रकाश राठोड, प्रेमचंद चव्हाण, वाल्मिक राठोड, वाडीलाल जाधव, पुनमचंद जाधव, मुकेश खैरे, ग्रामपंचायत कर्मचारी वसंत चव्हाण, महेश चव्हाण, आशासेविका, मदतणीस यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.