महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार – रामदास आठवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

आज शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चाललेले प्रयत्न खिळखिळे होणार आहेत. राष्ट्रीयस्तरावर विरोधी पक्षाच्या एकजुटीला खीळ बसणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ना. रामदास आठवले पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद; केंद्रात कॅबीनेट मंत्रीपद भुषविलेले आहे. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्यांनी राजकीय पटलावर आपल्या नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविलेला आहे. संपूर्ण देशात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन चांगले वाढविले आहे. महाराष्ट्रात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व उभे आहे. त्यांच्या सारखे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दुसरे मिळु शकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद शरद पवारांनी सोडल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस खिळखिळी होईल. शरद पवारांएवढे उत्तुंग नेतृत्व इतर कोणताही नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसला देऊ शकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्या ताकदीने शरद पवारांनी चालविली त्या ताकदीने इतर कोणताही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चालवु शकत नाही. भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कमजोर होत जाईल असे ना.रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Protected Content