मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामसभेतील वादाच्या कारणावरून तालुक्यातील वायला येथे दाम्पत्यास बेदम मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील वायला येथे दाम्पत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. या संदर्भात राहूल अर्जून इंगळे ( वय ३२, रा. वायला, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली. यानुसार, त्यांची पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत त्यांचा काही जणांशी वाद झालेला होता.
दरम्यान, या वादातूनच त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ आणि वहिनी घरी असतांना जमावाने त्यांना मारहाण करत त्यांच्या कारची मोडतोड केली. तसेच, त्यांच्या किराणा दुकानातून रोकड घेऊन पलायन केले. यात निर्मलाबाई अर्जुन इंगळे आणि अर्जुन किसन इंगळे हे जखमी झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीनुसार, सुधाकर सुरेश निकम, जितेंद्र सुरेश निकम, कृष्णा उत्तम निकम, रवींद्र राजेंद्र निकम, संजय राजेंद्र निकम, राजेंद्र शंकर निकम, कमलाकर भास्कर इंगळे आणि भास्कर पुंजाजी इंगळे यांच्यासह सहा महिलांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम १४१, १४३, १४७, १४९, ३३७, ३२४, ३२७ व ५०६ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रावण जवरे हे करत आहेत.