जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील देव्हारी गावातील २४ वर्षीय तरूणाने सततची नापीकी आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आई मन हेलवणारा आक्रोश केला होता. अमोल अरूण पाटील (वय-२४) रा. देव्हारी ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अमोल पाटील हा आई कल्पना यांच्यासोबत वस्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिवाह करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेली सततची नापीकीमुळे तो चिंतेत होता. शिवाय शेती करण्यासाठी काढलेले सोसायटीचे कर्ज आणि सावकारी कर्ज काढलेले होते. पिकांच्या नुकसानीला कंटाळून अमोलने बुधवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी आई कल्पनाबाई पाटील या घरी आल्या तेव्हा त्यांनी मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थ व तरूणांनी खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अमोलच्या पश्चात आई कल्पनाबाई आणि विवाहित बहिण रूपाली असा परिवार आहे.