मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केले आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणारी रॅप सॉंग्स तयार करत आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांकडून सुरु आहेत याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात जयंत पाटील यांनी आज ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो. म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत. या तरूणांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबरीपणे उभी राहणार असल्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली आहे.