मुंबई (वृत्तसंस्था) वाढती अन्नधान्य महागाई आणि मंदावलेला विकास यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण आज जाहीर झाले आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. पण ग्राहकांना रेटो रेटचा फायदा केव्हा आणि किती मिळणार? हे बँकांवर अवलंबून आहे.
बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीच्या शुल्कात कपात करत या निर्णयाचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवा असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बाबतचे निर्देश बँकांना एका आठवड्यात मिळतील असेही आरबीआयने म्हटले आहे. उद्योजक तसेच व्यक्तिगत कर्जदार यांच्यासाठी ही समाधानाची बाब ठरण्याची शक्यता आहे. कारण निधीची उपलब्धता स्वस्तात होणार असल्याने बँका आपल्या ग्राहकांच्या डोक्यावरील कर्जावरील व्याजाचा भारही हलका करतील अशी अपेक्षा आहे. जर बँकांनी आपले व्याजदर कमी केले तर नवीन कर्जांवरील व्याजदर तर घडतीलच, शिवाय आधीच्या कर्जदारांचा ईएमआयही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, बँका हा कमी झालेल्या कर्जभाराचा लाभ ग्राहकांना कसा व कधी देते हे बघावे लागेल.