जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुस्तके, वाचन, साहित्य यामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होतो. ज्ञान अधिक समृद्ध होते. शब्दभांडार वाढतो यात दुमत नाही. वाचन जीवन समृद्ध करत असल्याने आजच्या युवकांनी वाचनाचा आवाका वाढवावा असे मनोगत लेखक प्रा. व.पु. होले यांनी कौतुक पाहे तू संचिताचे, व तर आनंद तरंग उठणारच या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.
के.सी.ई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय(स्वायत्त) आणि शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. व.पु. होले लिखित ” कौतुक पाहे संचिताचे” व तर आनंद तरंग उठणारच! या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मु. जे. महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे पार पडला या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे प्रा.होले यांनी सांगितले कि, पुस्तके आयुष्यात टर्निग पॉईट ठरतात.लेखक लिहितो कारण समाजात जेव्हा नकारात्मक आणि असंतुलित कारणे दिसतात त्या बाबी संतुलित व सकारत्मक होण्याकरिता लिखाणाला गती येते असे मत व्यक्त केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी के.सी.ई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे होते. तसेच मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, श्रीकांत उमरीकर, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. साहेबराव भूकन उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रकाशन डॉ. साहेबराव भूकन श्रीकांत उमरीकर यांच्या हस्ते झाले.प्रा. विजय लोहार, प्रा.गोपीचंद धनगर, डॉ. भरतसिंग पाटील यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती संभाजी नगर येथील जनशक्ती वाचक चळवळकार व लेखक श्रीकांत उमरीकर यांनी आजच्या सामाजिक माध्यम युगात पुस्तक प्रकाशित होतात याचा अधिक आनंद आहे.आजकाल मराठी कुणी वाचत नाही हा मुद्दाच गौण आहे.ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात जातात आणि ज्यांच्या घरात एकही मराठी वृतपत्र येत नाही तेच लोक मराठी कुणी वाचत नाही असा टाहो फोडतात.खरेतर जे जे चांगले ते लोक आवर्जून वाचतात असे नमूद केले.प्रा.व.पु.होलेंच्या पुस्तकात एकत्र कुटुंब पद्धती आणि वारकरी संप्रदाय आणि बोली भाषेचा गोडवा जाणवतो असे सांगितले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रा.साहेबराव भूकन यांनी खान्देशी साहित्य जगण्याचा समृद्ध वारसा आपापल्या परीने पोहचवत आहे. प्रा.व.पु.होले यांच्या साहित्यात वारकरी संप्रदायाचे संचित माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे याची उक्ती सतत जाणवते.तसेच पुस्तकातील ३० ललित लेखनात भावनांचा अविष्कार,निव्वळ आनंद अथवा मनोरंजन करणे यापलीकडे जगावे कसे याचा परिपाक देतात.सुख दुःखाचे धागे आडवे उभे घट्टविणले गेले आहेत.जग आता जवळ आले आहे इतरांशी बोलयाचे असल्यास सेकंदात संवाद होतो आणि स्वतःशी आत्मसंवाद होत नाही याची बोच राहते. प्रा.होले उत्कृष्ट कथाकथनकार आहेत त्यामुळे त्यांची दोघे पुस्तक आपल्याशी संवाद साधतात.
अध्यक्षीय मनोगत सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर यांनी केले. या सोहळ्यात प्रा.व.पु. होले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रा.व.पु. होले यांची दोघे पुस्तके ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले तर आभार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.