जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील एका मंदिरात बांधकाम करण्यावरून एकाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरुवार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कियामदनी सत्तार देशपांडे (वय-५१) रा. पटेल वाडा, म्हसावद ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर मंदिराच्या भिंती बांधण्याच्या कारणावरून गावात राहणारे चेतन पाटील आणि भुरा चित्ते यांच्याशी वाद झाला. या वादातून कियामदनी देशपांडे याला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान कियामदनी देशपांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन पाटील आणि भुरा चित्ते दोन्ही रा. म्हसावद ता. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.