पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील साई कॉम्प्यूटर्स दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील ७ ते ८ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा शहरातील २२ वर्ष जुने असलेलं संगणक व साहित्य खरेदी विक्री व्यवसायातील प्रतिष्ठित व्यावसायिक उमेश राऊत यांचे असलेले साई कॉम्प्युटर्स येथे दुपारी १ ते १:४५ वाजेच्या सुमारास आग लागल्याने या दुकानातील संगणक, लॅपटॉप प्रिंटर, व ईतर पेरिफेरलस यांचे साहित्य ,फर्निचर, एसी,आगीत जळून अंदाजित ७ ते ८ लाख रुपयांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला तसेच जीवित हानी झाली नसली तरी नागरीकांच्या व कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तत्काळ मदत केली गेली. परंतु पाचोरा नगरपालिकेचे अग्नीशमन वाहन हे अजिंठा येथे पाठविण्यात आले असल्याचे कळते त्यामुळे ते पाचोरा येथील घटने वेळी उपलब्ध होऊ शकले नाही म्हणजेच आणीबाणी प्रसंगी पाचोरा नगरपालिका ही अग्नीशमन यंत्रने बाबतीत परावलंबी असल्याचे निदर्शनास आले. किंवा पर्यायी व्यवस्था ही उपलब्ध होऊ शकत नाही हे या प्रसंगी प्रकर्षाने जाणवले.
आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व व्यापारी तसेच चालक वर्गाने प्रयत्नशील असल्याने मोठी क्षती झाली नाही परंतु लाखोंचे साहित्य आगीत जळून नुकसान झाले. अनेक संकटाना सामोरे जात व्यावसायिक आपली रोजीरोटी कमवीत असतात, आधीच कोरोनामुळे सबंध व्यावसायिक हे मेटाकुटीला आले आहे. शिवाय व्यवसायही त्यां प्रमाणात पुरेसे भरभराटीस येताना दिसत नाही असे असताना आगी सारख्या घटनांमुळे व्यावसायिक हवालदिल होऊन जातो. ज्या प्रमाणे आज बळीराजाला अस्मानी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. ना पदरी शासकीय अनुदान प्राप्त होत ना शेतमालाला योग्य भाव तशीच अवस्था आज सर्वच क्षेत्रातील लहान मोठ्या व्यावसायिकांची झालेली दिसत आहे.