जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी परत मागितल्याच्या कारणावरून एकाला काचेचा ग्लास मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक बाबूलाल झंवर (वय-५३) रा. कासमवाडी, जळगाव हे दूध डेअरीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. सोमवार १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दीपक झंवर हे प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी घेण्यासाठी आले. त्याठिकाणी कुंदन चौधरी (पूर्ण नाव माहित नाही) रा. महाबळ, जळगाव हा त्या ठिकाणी आला. दीपक झंवर यांनी कुंदनकडे त्यांची दुचाकी मागितली. याचा राग आल्याने कुंदनने त्याच्या हातात असलेला काचेचा ग्लास दीपकच्या डोक्यावर मारून फेकला. दीपकला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरीकांनी त्याला तत्काळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार घेतल्यांनतर मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कुंदन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.