जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे डिजिटल क्रांतीचा उदय झाला असला तरी, त्याच्या आशयाबाबतीत विश्वासार्हता जपणेही तितकेच महत्वाचे आहे. डिजिटल क्रांतीमुळे माध्यमांच्या कक्षा विस्तारल्या आहेत. त्यामुळे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सायबर मीडिया यांचे अभिसरण झाल्याने डिजिटल मीडियाचा प्रभाव सर्वच माध्यमांवर पडला असल्याचा सूर मान्यवरांच्या मनोगतातून ‘डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या’ विषयावर आयोजित परिसंवादात उमटला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतर्फे विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी परिसंवादाचे उद्घाटक म्हणून कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी , प्रमुख अतिथी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे , कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर, परिसंवाद सत्राचे अध्यक्ष मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशील नवाल, वक्ते दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने, लोकमतचे संपादक रवी टाले, साईमतचे संपादक प्रमोद बज्हाटे, सकाळचे आवृत्ती प्रमुख सचिन जोशी, लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी, जनशक्तीचे संपादक त्र्यंबक कापडे, पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन परिसंवादाचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविकात संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी डिजिटल मीडियातील साधनांचा उहापोह करुन परिसंवादामागील भूमिका विषद केली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी परिसंवादात विषयाला अनुसरुन विवेचन केले. सूत्रसंचालन डॉ. गोपी सोरडे यांनी तर आभार डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मांडले. यशस्वितेसाठी डॉ. रोहित कसबे, रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, महेश पाटील, भिकन बनसोडे यांच्यासह विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.
फिजिकल वरुन डिजिटलकडे वाटचाल: कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी
कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी उद्घाटक म्हणून बोलतांना सांगितले की, आपण फिजिकल वरुन डिजिटल कडे वाटचाल करीत आहोत. कोरोना काळात डिजिटल मीडियाचा वापर वेगाने वाढला. विद्याथ्र्यांपासून सामान्यांपर्यंत डिजिटल मीडियाचा वापर याकाळात वाढल. डिजिटल मीडियामुळे कल्पकतेला चालना मिळालेली आहे, सोशल कनेक्टीविटी वाढली आहे. सामान्यांना सुद्धा शिक्षणाची संधी ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे फायदे असले तरी डिजिटल मीडियामुळे काही सामाजिक प्रश्नही निर्माण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डिजिटल मीडियाच्या वापराने स्क्रिन टाईम वाढला आह.े साधारणत: भारतीय नागरिक 6 तास स्क्रिन टाईम खर्ची घालत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उज्वल भविष्यासाठी डिजिटल मीडिया आश्वासक – सुशील नवाल
परिसंवाद सत्राचे अध्यक्ष मल्टीमीडिया फिचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील नवाल यांनी आपल्या समारोपीय संबोधनात डिजिटल मीडिया संदर्भात सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले की, माध्यमशास्त्राच्या विद्याथ्र्यांनी अभ्यास करतांना डिजिटल मीडियाच्या वापराचे कौशल्य आत्मसात करावे आणि त्यामुळेच त्यांना रोजगाराच्या अनेक वाटा उपलब्ध होतील. साचेबंद आणि तोच तोच आशय न देता त्यात नाविन्यता आणणे हे व्यावसायिक डिजिटल मीडियाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डिजिटल मीडियाचा वापर करतांना ऑऊट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल. त्यामुळे उज्वल भविष्यासाठी डिजिटल मीडिया आश्वासक असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.
आशय हाच महत्वाचा घटक : रवी टाले
लोकमतचे संपादक रवी टाले म्हणाले की, डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे वृत्तपत्रांना अस्तित्वाचा लढा द्यावा लागणार आहे. डिजिटल मीडियामध्ये वेगाला महत्वाचे स्थान आहे. यात आशय हा वेगाने युझरपर्यंत पोहचत असला तरी तितक्याच वेगाने डिजिटल मीडियाची विश्वासार्हता घटत आहे. त्यामुळे विश्वासार्हता जपायची असेल तर आशयाची पडताळणी करणे महत्वाचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांनी बदल स्वीकारावा – हेमंत अलोने
देशदूतचे संपादक हेमंत अलोने म्हणाले की, डिजिटल मीडियाच्या प्रभावात ज्या माध्यमांनी बदल स्वीकारला त्यांचे अस्तित्व टिकले. मात्र ज्यांनी बदल स्वीकारण्यास उशीर केला त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. युझरच आशयाचे व्यवस्थापन करीत असल्याने त्याची पडताळणी करणारी कोणतीच संस्था नाही, त्यामुळे डिजिटल मीडियावरील विश्वासार्हत्ेाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुद्रित माध्यमांवरच विश्वास अधिक – प्रमोद बऱ्हाटे
साईमतचे संपादक प्रमोद ब-हाटे म्हणाले की, पारंपरिक माध्यमांकडून डिजिटल माध्यमांकडे वाटलाच सध्या सुरु आहे. मात्र काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक माध्यमांचा वापरच सुखकर असल्याचे जाणवते. डिजिटल मीडियाचे प्रस्थ असले तरी मुद्रित माध्यमांवरच विश्वास अधिक असल्याने न्यायव्यवस्थेत डिजिटल मीडियापेक्षा वृत्तपत्रीय बातम्यांवर विश्वास दर्शविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्याची पत्रकारिता ही डेटा जर्नालिझम असणार : शेखर पाटील
लाईव्ह ट्रेडचे संपादक शेखर पाटील यांनी डिजिटल मीडिया संदर्भात अभ्यासपूर्ण मांडली केली. ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धीमत्ता ही डिजिटल मीडियाचा उद्याचा काळ असणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील ऑटोमायझेशन तंत्रज्ञानास संगणकीय आणि तांत्रिक बुद्धीमत्तेची जोड असल्याने वर्क फ्रॉर्म एनी वेअर ही संकल्पना वेगाने विकसित होत आहे. फिजिकल आणि व्र्हच्युअल यात फरक राहणार नाही. माध्यमांमध्ये दर्जेदार आशय निर्मिती करणाऱ्याचे अस्तित्व पुढे टिकणार असून उद्याची पत्रकारिता ही डेटा जर्नालिझम राहील असे सुतोवाच त्यांनी केले.
पत्रकारिताच मुख्य आधार : सचिन जोशी
दैनिक सकाळचे आवृत्ती प्रमुख सचिन जोशी म्हणाले की, डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात पत्रकारितेत करीअर करु इच्छिणाज्या विद्याथ्र्यांनी वाचन, लेखन आणि चिंतन याकडे लक्ष द्यावे, तसेच तंत्रज्ञानही आत्मसात करावे तरच डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात ते यशस्वी होऊ शकतील. यासोबतच त्यांचे भाषा व व्याकरणाचे ज्ञानही तितकेच महत्वाचे असल्याचे नमूद केले.
डिजिटल मीडियामुळे विशेष वृत्तांकनाकडे दुर्लक्ष – मनोज बारी
डिजिटल मीडियामुळे तयार आशय मिळतो. त्यामुळे विशेष वृत्तांकनांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी यांनी व्यक्त केली. बातम्यांची सत्यता पडताळणी ही डिजिटल मीडियापुढील सर्वात मोठे आव्हान आहे यात बातम्यांच्या उगम खात्रीशीर घटकांकडून येत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांनी मूल्य जोपासावीत – त्र्यंबक कापडे
डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी माध्यमांनी मूल्यांची जोपासनाही करावी असे मत जनशक्तिचे संपादक त्र्यंबक कापडे यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडियामुळे बातम्यांचा फॅार्म आणि फॉर्मेटही बदलत चाललेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारितेच्या क्षेत्रात करीअर करायचे असल्यास मराठी, हिंदी भाषेसोबत इंग्रजीचेही ज्ञान असायला हवे असेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक – विकास भदाणे
पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकारिता करतांना भाषेवर तर प्रिंट मीडियाची पत्रकारिता करतांना लिखाणावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल मीडियासाठी पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त करुन माध्यमातील बदलत्या स्थित्यंतंरावर त्यांनी प्रकाश टाकला.