पाचोरा-नंदू शेलकर । पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील शेतकऱ्याची शेत जमिन लघु पाटबंधारे बांधकाम विभागाने सन – १९९१ मध्ये संपादीत करुन जमिनीवर ताबा घेतला आहे. मात्र तब्बल ३१ वर्ष उलटून ही पिडीत वृद्ध शेतकऱ्यास त्याच्या हक्काच्या शेत जमिनीचा पुर्ण मोबदला मिळत नसल्याने वृद्ध शेतकऱ्याने वारंवार लघु पाटबंधारे बांधकाम विभागाशी तसेच वरिष्ठ पातळीवर हेलपाट्या मारुन देखील न्याय मिळत नसल्याने वृद्ध शेतकरी, त्याची पत्नी व मुलगा यांनी आज १६ जानेवारी पासुन २३ जानेवारी पर्यंत पाचोरा येथील मोंढाळे रोडवरील लघु पाटबंधारे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्महत्या मृत्यू पुर्व आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु” येथील शेतकरी सुभाष रामलाल पाटील यांची तारखेडा शिवारातील गट क्रं. ३३७ / १ मधील ८५ आर. क्षेत्र हे लघु पाटबंधारे बांधकाम विभागाने दि. १ जुन १९९१ रोजी संपादीत करुन त्या क्षेत्रावर ताबा घेतला आहे. मात्र त्या जमिनीचा पुर्ण मोबदला सुभाष पाटील यांना आज पावेतो मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात सुभाष पाटील यांनी वेळोवेळी पाचोरा येथील लघु पाटबंधारे बांधकाम विभागासह संबंधित विभागाचे जळगांव, नाशिक कार्यालयात जावुन त्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी मागणी केली. मात्र सुभाष पाटील यांना संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवुन वेळ मारुन नेली. तद्नंतर पिडीत सुभाष पाटील यांनी मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता. परंतु त्यावेळेस त्यांना खोटी आश्वासने देवुन प्रशासनाने त्यांच्या तोंडास पुन्हा एकदा पाने पुसली. सुभाष पाटील यांच्या परिवारात पत्नी व एक अविवाहित मुलगा असा परिवार असुन त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन लघु पाटबंधारे बांधकाम विभागाने बळकावलेली शेत जमिन असुन त्याचा मोबदला मिळविण्यासाठी वृद्ध दाम्पत्य व त्यांचा मुलगा आज देखील धडपडत आहेत. त्याच अनुषंगाने सुभाष रामलाल पाटील, पत्नी अलकाबाई सुभाष पाटील व मुलगा चेतन सुभाष पाटील हे कु़ंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास झोपेतुन जागे करण्यासाठी व त्यांच्या पदरात त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा या दृढ हेतुने पाचोरा येथील मोंढाळे रोडवरील लघु पाटबंधारे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्महत्या मृत्यू पुर्व आमरण उपोषणास बसले आहेत.